राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; ४ जण ठार तर ७ जखमी
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; ४ जण ठार तर ७ जखमी
img
दैनिक भ्रमर
कोल्हापूर :

सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने मजुरांच्या गटाला उडवल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री आठच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. हातकणंगले) येथील पुलाजवळ घडला आहे.

माहितीनुसार, कोल्हापूर शहरानजीक असलेल्या शिये गावातून रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांचा गट काम आटोपून भादोले या गावाकडे सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन जोडून निघाले होते. यावेळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे सर्विस रोडला त्यांचा टेम्पो आला.

यावेळी सकाळी पुन्हा तिथे अजून एक काँक्रीटचे काम असल्याने पाठीमागील मिक्सर मशीन तिथेच सोडून जाण्यासाठी गटामधील मजूर खाली उतरले. टेम्पोचे मशीन सोडवून रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने या मजुरांना जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात सचिन धनवडे (४०) हा जागीच ठार झाला. तर टेम्पोतील बाबालाल इमाम मुजावर (५०), विकास वड्ड (३२), श्रीकेश्वर पासवान (६०) अशा एकूण ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुनिल कांबळे, सचिन नलवडे, लक्ष्मण मनोहर राठोड, ऐश्वर्या लक्ष्मण राठोड, सविता लक्ष्मण राठोड, कुमार अवघडे अन्य एक (सर्व रा.भादोले ) हे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या सर्व जखमींना सीपीआरमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमींवर पेठ वडगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिक घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाले. मात्र घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून अपघाताची भीषणता समोर आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group