"माझ्या मागून आलेले मंत्री झाले ; मी अजून किती दाढी पिकवायची"? "या" नेत्याचं वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
सिंधुदुर्ग :  कुडाळ-मालवणमधील सभेत बोलताना निलेश राणेंनी मोठं वक्तव्य केलं आहे .  मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे सर्व माझ्यानंतर आमदार-खासदार होऊन मंत्री झाले. 

मात्र मला कुडाळ मालवण विधानसभेच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी असं शिवसेना शिंदे गटाचे कुडाळचे उमेदवार निलेश राणे यांनी म्हटलं. जिथे माझ्या साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय असंही ते म्हणाले. 

लोकसभेत नारायण राणे निवडून यावेत असं नियतीला मान्य होतं म्हणून ते लोकसभेत निवडून आले आणि आता विधानसभेला निलेश राणे निवडून आला पाहिजे असंही नियतीला मान्य असल्याचं दिसतंय असं निलेश राणे म्हणाले. 

आम्ही भरगच्च असा पक्ष प्रवेश करतो, मात्र विरोधक पक्षप्रवेश घेत असताना दोन पाच दहा लोकांचा घेतात असं निलेश राणे म्हणाले. मी जबरदस्तीचे पक्षप्रवेश करत नाही, मी दांडे घेऊन कुठल्याही प्रशासकीय ऑफिसमध्ये जात नाही असा टोलाही त्यांनी वैभव नाईक यांचे नाव न घेता लगावला. 
 
साहेबांचा पराभव झाला तिथे निवडून यायचं आहे

नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी मला अनेकदा विचारलं की राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर जाणार का? मी ते नाकारलं. जिथे माझ्या साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय. मी कुणालाही हरवण्यासाठी आलेलो नाही. काहीतरी चांगलं करण्यासाठी आलो आहे. 

निलेश राणे कशातही सापडत नसल्यामुळे त्याला बदनाम केलं पाहिजे, त्याला कुठेतरी अडकवला पहिजे, त्याला भडकवलं पाहिजे. मात्र ते विसरलेत मला हल्ली रागच येत नाही असं निलेश राणे म्हणाले. येत्या 15 दिवसात निवडून येणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group