बारामतीमधील विधानसभेच्या निवडणुकीवरुन भरसभेत अजित पवार यांना अश्रू अनावर ; वाचा काय म्हणाले....
बारामतीमधील विधानसभेच्या निवडणुकीवरुन भरसभेत अजित पवार यांना अश्रू अनावर ; वाचा काय म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
पुणे :  राज्याचं लक्ष लागेल्लया बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार त्यांच्याविरुद्ध बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, बारामतीमधील निवडणुकीत चांगलीच चूरस वाढली आहे.  

लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार कुटुंबातच लढत झाली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत महाराष्ट्राने पाहिली, त्यामध्ये सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार, काका-पुतण्याच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी, अजित पवारांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी केली, तसेच ते भावूक झाल्याचंही दिसून आलं. 

लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला.. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा. शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा  मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला भीती वाटते बोलताना, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास होतोय, अशी भावनिक सादही बारामतीकरांना अजित पवारांनी घातली.  

अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच एक कार्यकर्ता उठला आणि विचारले दादा खासदाराला निधी किती असतो. त्यावर अजित पवारांनी बारीक आवाज काढून पाच कोटी सांगितले. बघा दादा किती बदलला आहे? आधीचा दादा असता तर आवाज वाढवून बोलला असता, असे म्हणत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, एक कार्यकर्ता म्हणाला दादा याला (लहान मुलाला) तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर अजित पवार म्हणाले आता काय मिठी मारू का? मात्र अजित पवारांच्या लक्षात येताच बेटा बस असे धीरगंभीर आवाजात अजित पवार म्हणाल्याचेही पाहायला मिळालं.
 
अजित पवार भावूक

मागे मी चूक केली, आता चूक कुणी केली? आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका. तुटायला वेळ लागत नाही, असे म्हणत बारामतीमधील विधानसभेच्या निवडणुकीवरुन अजित पवार भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बारामतीची निवडणूक यंदा जेवढी चुरशीची आहे, तेवढीच भावनिकही होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.  

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group