मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना साद घालण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने खास मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मिशन “ताई, माई, अक्का” या खास मिशन अंतर्गत शिंदे गटाकडून महिला व्होटबँकेला साद घातली जाणार आहे. या मोहिमेतंर्गत शिंदे गटाकडून राज्य सरकारने महिलांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या प्रचारावर भर दिला जाणार आहे.
मिशन “ताई, माई, अक्का” अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिंदे गटाकडून महिलांचे मेळावे घेण्यात येणार आहेत.
राज्यात शिवसेनेचा पहिला महिला मेळावा शुक्रवारी सिल्लोडमध्ये होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या मेळाव्यांच्या माध्यमातून राज्यातील घराघरात पोहचण्यासाठी शिंदे गटाकडून ही मोहीम राबवली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ८० लाखाहून अधिक अर्ज हे शासनाकडे आले आहेत. या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या बहिणी 31 ऑगस्ट रोजी अर्ज करतील, त्यांनाही जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे.