ठाकरे गटात हालचालींना वेग , होणार मोठा बदल, आदित्य ठाकरेंना प्रमोशन मिळणार ?
ठाकरे गटात हालचालींना वेग , होणार मोठा बदल, आदित्य ठाकरेंना प्रमोशन मिळणार ?
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो. 

आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढणार असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अधिकार येतील, असे सांगितले जात आहे.  2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी तशाचप्रकारे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलवून तसा रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो. 

कार्याध्यक्षपद मिळाल्यास आदित्य ठाकरे पक्षात स्वतःची नवी आणि तरुण टीम तयार करण्याची शक्यता आहे. यामध्ये निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते. तसेच संघटनेत फेरबदल केले जाऊ शकतात. तळागाळातील संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काही मोठे फेरबदल होतील, असेही बोललं जात आहे. निवडणुकांनंतरच्या काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि आक्रमकता वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व निर्णायक ठरणार आहे, असे बोललं जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group