मुंबई : महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक भागांत उन्हाचे चटके जाणवत असताना विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाराष्ट्रात सध्या मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 24 तासातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसाच राज्याच्या विविध भागात पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आजही पावसाची शक्यता कायम आहे. ठाणेसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने ठाणे, रायगडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतही आज हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि आणि किमान तापमान 27अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
ठाणे, रायगडमध्ये पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यासोबतच, मुंबई, पालघरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही आयएमडीमने दिला आहे.
या भागात पावसाच्या सरी कोसळणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातही पुढील 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, सातारा, लातूर, नांदेड जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.