देशासह राज्याच्या हवामानात गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. मार्चमध्ये उन्हाच्या झळा बसल्यानंतर मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह राज्यात रविवारपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे. देशात काही भागांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हेरावून गेला आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने ढग दाटले असताना मुंबईसह किनारपट्टीभागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजही पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबईतील कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 22°C च्या आसपास असेल.
एप्रिल-जूनमध्ये उष्णतेची लाट
एप्रिल महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिल-जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भागात आणि उत्तर पश्चिम, मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागांत तापमानात मोठी वाढ दिसून येईल.
या भागात उष्णतेची लाट
भारतीय हवामान खात्याने देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती जाहीर केली आहे. ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, पूर्व तेलंगणा, उत्तर तामिळनाडू आणि उत्तर कर्नाटक या भागात उप्षणतेची लाट पाहायला मिळणार आहे. आयएमडीने किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भात ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात यलो अलर्ट
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांना आयएएमडीकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भारतीय हवामान विभागाने अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.