राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं मराठवाड्याला रौद्ररुप दाखवले. हिंगोली, नांदेड, परभणीसह बहुतांश भागांना पावसानं झोडपले. दरम्यान, आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट दिलाय..
अरबी समुद्रात सक्रीय झालेल्या चक्रीवादळाने राज्यात बेफाम पाऊस झाला. दुष्काळी मराठवाड्यातली कोरडी धरणं जिवंत झाली. विहिरी काठोकाठ भरल्या. काही ठिकाणी नद्यांना पूर येऊन शेती पाण्यात गेली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. दरम्यान, आता पुढील १२ तासांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
राज्यात मुसळधार पाऊस होत असताना मराठवाड्यात पावसानं दाणादाण उडाली आहे. हिंगोली, नांदेड, परभणीत पुराचा वेढा घातल्यानंतर आज हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आज हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे. आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पुढील तीन दिवस हलक्या सरींच्या पावसाचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने x माध्यमावरही अंदाज पोस्ट केला आहे.