राज्यातील अनेक भागात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. दरम्यान, येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रात धुव्वाधार पाऊस कोसळणारस अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, नाशिक, जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तिकडे मराठवाड्यातील ,छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेडसह परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याच अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. आता हळहळू मान्सून संपूर्ण राज्याला व्यापणार असून पुढील ४-५ दिवस राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मुंबईसह उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत परिसरात जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतुकीचा मोठा खोंळबा झाला होता.
दादर टीटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली. दुसरीकडे पावसाचा फटका लोकल सेवेलाही बसला. काही गाड्यात १० ते १२ मिनिटे उशिराने धावत होत्या.