बाप्प्पाच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा तुमच्या शहरातील काय आहे स्थिती....
बाप्प्पाच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा तुमच्या शहरातील काय आहे स्थिती....
img
Dipali Ghadwaje
आज गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

आयएमडीने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता  आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात दिवसभर पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


याशिवाय गडचिरोली, वाशिम, यवतमाळ तसेच आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार आहे. दुसरीकडे मुंबईसह पुणे शहराला देखील पावसाचा अलर्ट  जारी करण्यात आला आहे. 

भारतीय हवामान खात्याने पुणे शहराला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच पुणेकरांची तारांबळ उडू शकते.

आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आजपासून पुढील ४ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. रायगड, सातारा आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group