वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन तासांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांत नाशिक, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (मंगळवारी आणि बुधवारी) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता?
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, मंगळवार २७ आणि बुधवार २८ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.
याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.