ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. आधीच दमट वातावरण असणाऱ्या मुंबईनगरीत तापमान अधिकच वाढल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण होत घामानं डबडबले होते. पण आता शेवटी मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागल्याचं दिसतंय.
गेल्या 9 वर्षांतल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली आहे. मुंबईतल्या सांता्क्रूज केंद्रावर आज 13.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये किमान तापमान 11.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले होते.
उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर राजस्थानमध्ये थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत आहेत.उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढल्याचं सांगण्यात येत असून येत्या 24 तासांत मुंबईकरांना हुडहुडी भरणार आहे.
मुंबई महाबळेश्वरपेक्षाही थंड?
थंड हवेच्या ठिकाणांपैकी असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही आज मुंबईत कमी तापमानाची नोंद झाली आहे. गारठा वाढला असून गेल्या नऊ वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद मुंबईत झालीय. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान 13.7 अंश सेल्सिअसवर होते. तर कुलाब्यातही १९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मुंबईकरांना आता कपाटात ठेवलेले स्वेटर कानटोप्या बाहेर काढाव्या लागणार आहेत. मुंबईत आज 9 वर्षांतल्या निचांकी तापमानाची नोंद झाली असून गारठ्यानं मुंबईकरांचे दात वाजू लागले आहेत. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक, पुण्यात येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
नाशिकमध्येही कडाका वाढला
ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ झाली होती. नाशिक शहरात पारा 9.4 अंशावर तर निफाड मध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. आता पुन्हा तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे.