पुणे : मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज, बुधवारी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उन्हाळा सर्वोच्च अवस्थेत पोहोचला आहे. उत्तर भारत, गंगा नदीचे खोरे, दक्षिण भारतात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थानवरून उष्ण वारे किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातून राज्यात येत आहे. तसेच राज्याच्या वातावरणात तीन ते सात किलोमीटर अंतरावर प्रति चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे.
त्यामुळे वातावरणातील उष्ण वारे जमिनीकडे दाबले जात आहे. परिणामी मुंबईसह उत्तर किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. दिवसभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागू शकतो, तसेच रात्रीही असह्य उकाडा जाणविण्याची शक्यता आहे.
विदर्भात पुढील तीन-चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.