केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार 10 एप्रिल रोजी देशाच्या विविध राज्यांमध्ये हवामानाची वेगवेगळी स्थिती पाहायला मिळेल. राजच्यातील दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र वाऱ्याचं क्षेत्र तयार होत असतानाच राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश मात्र उष्णतेची लाट अधिक तीव्र होताना दिसेल.
पुढील 24 तासांमध्ये आयएमडीनं दक्षिण भारतामध्ये पावसाचा इशारा जारी केला असून, मध्य आणि उत्तर भारतामध्ये मात्र तापमानात वाढ अपेक्षित असेल असं सांगितलं आहे.
इथं महाराष्ट्रात उष्णतेमुळं होणारी होरपळ अद्याप थांबलेली नाही. राज्यातील विदर्भ क्षेत्रावर सूर्यकिरणांचा तीव्र मारा सातत्यानं सुरू असून, त्यामुळं नजीकच्या भागांमध्येही या उष्णतेच्या झळा पोहोचू लागल्या आहेत.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही हीच स्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथं करण्यात आली असून, हा आकडा 44.1 अंश सेल्सिअस इतका असल्याची नोंद करण्यात आली.
एकिकडे उष्णता गंभीर रुप धारण करत असतानाच याच कारणास्तव बाष्पीभवन प्रक्रियेला वेग येत असून, त्यामुळं वादळी पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
ज्यामुळं विदर्भात पुढील 24 तासांसाठी वादळी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंत त्याचा परिणाम दिसत आहे. त्यातच राजस्थानपासून विदर्भाच्या वायव्येपर्यंतसुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं याच प्रणालीच्या परिणामस्वरुप राज्यावर पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत.