ऐन पावसाळी हंगामात पावसाने दडी मारल्याने राज्यात विविध भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन उशीरा झाल्याने याआधीच शेतकरी हवालदील झाला होता. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती पंरतू त्यानंतर त्यानंतर पावसाने दडी मारली.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशात स्थिती मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पूर्वीचा असलेला जोरदार पावसाचा जोर आता ओसरत चालला आहे. सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा दोन डिग्रीने वाढ झाली आहे. पुढील आठवडाभर म्हणजे कदाचित 10 सप्टेंबरपर्यंत ही स्थिती टिकून राहू शकते. त्यामुळं उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ आणि वाऱ्याची शांतता यामुळं खरीप पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस झाला आहे.