गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. जवळपास तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अशावेळी आता गुजरातवरील अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रावर येऊन शुक्रवारी (30 ऑगस्ट) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसत आहे. पण दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने आजपासून राज्यातील काही भागात पाऊस वाढेल, असा अंदाज दिला आहे. विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट!
IMD ने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील 24 तासात कोकण, विदर्भ इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कुठे रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह अधूनमधून 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास असेल.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.