राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. या अवेळी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. यामुळे उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे. हवामान विभागाने आज अनेक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी तापमानात वाढ होईल असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या गारपीट आणि पावसाचा शेतातील पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
राज्याची राजधानी मु्ंबई शहरात काल दिवसभर ढगाळ हवामान होते. आज या शहरात हलका पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. लातूर जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात मोठा बदल झाला आहे. विदर्भातील चंद्रपुरातील ब्रह्मपुरी येथे मात्र काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली.