मान्सून दाखल होऊनही सध्या राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशातच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचे सावट आणणारा अल निनोचा प्रभाव संपला आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज यूएस हवामान संस्थांनी वर्तवला आहे. इतकंच नाही, तर यंदाचा पाऊस गेल्यावर्षीच्या पावसाची कमतरता भरून काढू शकतो, असंही अमेरिकन हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
अल निनोचा भारतीय हवामानावर नकारात्मक प्रभाव पडतो. तर ला निना भारतातील मान्सूनसाठी अनुकूल आहे. अगदी वर्षभरापूर्वी पॅसिफिक महासागरातील पेरूजवळील समुद्राच्या पृष्ठभागाजवळ अल निनो तयार झाला होता. जवळजवळ ११ महिने अल निनोने जागतिक हवामानावर वर्चस्व गाजवलं.
यामुळे देशातील वातावरणात मोठे बदल झाले. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. याशिवाय पाण्याची परिस्थिती देखील गंभीर बनली. अखेरीस अल निनोचे राज्य संपले आहे.
अमेरिकन हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, पॅसिफिक महासागरात सुमारे दोन महिन्यानंतर ला नीना तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानात मोठे बदल होऊन पावसाला पोषक असे वातावरण तयार होईल. परिणामी हंगामाच्या उत्तरार्धात भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल.
अमेरिकेच्या हवामान खात्याने काय सांगितले? ज
वळपास ११ महिन्यांच्या कालावधीनंतर अल निनोचा प्रभाव संपला आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये ला नीना विकसित होण्याची 65% शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. ला निनाची अशी स्थिती दर ३ ते ७ वर्षांनी तयार होते. ज्यामुळे अनेक भागात चांगला पाऊस होतो. ला निनामुळे महासागरातील पृष्ठभागावरील पाणी सामान्य पातळीच्या खाली थंड होते. वाऱ्यांच्या बदलांमुळे जगातील हवामानात मोठे बदल होतात. परिणामी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होतो.