मागील आठवडाभरापासून विश्रांती घेणारा पाऊस सक्रिय झाला असून पावसानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. तोंडावर आलेल्या गणेशोत्सवासाठी अनेकांचीच तयारी सुरु असताना इथं पाऊस काही पिछेहाट करताना दिसत नाहीय. हाच पाऊस पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुक्कामी आसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान राज्यात काही ठिकाणी पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी प्रसिद्ध केला. या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्याचा जोर साधारण 4 सप्टेंबरपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 30 ते 40 किमी सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपमगरामध्ये आकाश अंशत: ढगाळ आकाश राहील आणि इथं हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
देशभरात पावसाचं थैमान
गुजरातमध्ये थैमान घालणाऱ्या पावसानं आता मोर्चा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इथं वळवला असून, ही परिस्थिती आणखी बिघडणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशातील 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशाशिवाय यामध्ये गुजरात, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, चंडीगढ़, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, कर्नाटक, केरल, पश्चिम बंगाल, सिक्किम, मणिपुर, असम, नगालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांसाठी हा इशारा लागू असेल.