परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने तुरळक ठिकाणी मध्यम हजेरी लावल्याचं चित्र होतं. आता पुढील काही दिवसांमध्ये पावसाची परिस्थिती कशी असेल याबद्दल अंदाज वर्तवला गेला आहे.
राज्यात पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भासह अन्य काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. तो आता गुजरातमधील कच्छपर्यंत पोहोचला आहे.
त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा २४ तासांत तयार होणार आहे. याच्या परिणामामुळे राज्यातील पाऊस वाढणार असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात देखील पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे.
यलो अलर्ट : पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आज पासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.