राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा चार ते पाच अंश सेल्सिअसवर पोहचला. गोठवणाऱ्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत होत्या, पण आता थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे आणि आता हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून, पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी, इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून, पुढील दोन दिवसांत राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
किमान तापमानात वाढ झाली असून, विदर्भात येत्या २४ व २५ डिसेंबरला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
काही दिवसांत हाडे गोठवणारी थंडी होती. त्यावेळी चार ते पाच अंश सेल्सिअस वर असणारे किमान तापमान आता ११ ते १५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे.
राज्यातील काही भागात गारठा कायम असला तरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढलाय.
दरम्यान येत्या पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही आहे. त्यातही विशेषतः गुरुवार, २६ ते शनिवार दि.२८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसात पावसाची शक्यता अधिक आहे.