नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) – वंजारवाडी आणि पंचक्रोशीत संध्याकाळी आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने प्रचंड हाहाकार माजवला. दोन तासांच्या या मुसळधार पावसाने शेतात लावलेली अनेक पिके वाहून गेली.
कालपासून परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार बरसात केली. आज दिवसभर पुन्हा वातावरण गरम होते, संध्याकाळी अचानक ढगांनी आकाश व्यापले आणि भगूर जवळील वंजारवाडी, लोहशिंगवे व मिलिटरी भागात साडेचार वाजेपासून सहा वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरु झाला.
या पावसामुळे भात, टोमॅटो, झेंडूच्या फुलांचे, सोयाबीनचे शेत अक्षरशः वाहून गेले. अनेक शेतांमध्ये पाणीच पाणी साचले. ज्यामुळे शेतकऱ्यांची हाहाकाराची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या आपत्तीमुळे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी केली आहे.
या प्रकारच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भविष्याविषयी चिंता वाढली आहे. त्यांना योग्य मदतीची आणि भरपाईची आवश्यकता आहे, अन्यथा त्यांच्या कष्टाचे पीक पुन्हा एकदा पाण्यात वाहून जाईल. स्थानिक प्रशासनाने लवकरच या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यास प्रारंभ करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.