मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचं आज 6 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झालं आहे.
हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मान्सून कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले.
हवामान विभागाने 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र आता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अल्रर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली असल्यानं बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत आणि 48 तासात कोकणात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.