गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाचं धूमशान पाहायला मिळालं. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं असून बळीराजा त्रस्त झाला होता. त्यानंतर आता हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील काही भागात पाऊस तसेच गारपिट होण्याची शक्यता आहे, यामुळे थंडीचा कडाका देखील वाढण्याची शक्यता आहे
येत्या तीन ते चार दिवसांत हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. राज्यासह देशात ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिल्लीतील हवामान पुन्हा बदलणार आहे. एवढेच नाही तर पावसासोबत गाराही पडू शकतात. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जोरदार वारे वाहतील. पाऊस पडेल आणि गाराही पडतील. त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. आजपासून पुढील ३ ते ४ दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तर पुण्यात गेले काही दिवस रात्रीच्या तापमानात घट दिसून येत आहे. पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण जाणवत आहे. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान 36 अंशावर राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
देशातील 'या' भागात पुढील 4 दिवस हवामान कसे असेल?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीपर्यंत जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अनेक भागात बर्फवृष्टीही होईल. याशिवाय मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. त्याचवेळी 18 फेब्रुवारीला जम्मूमध्ये, 18 आणि 19 फेब्रुवारीला हिमाचलमध्ये आणि 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते.
पावसाची शक्यता कुठे?
देशातील हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान उत्तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 ते 20 फेब्रुवारी दरम्यान, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक गारपीट होऊ शकते. विजा पडू शकतात आणि जोरदार वारे देखील वाहू शकतात. त्याच वेळी, 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान, सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. या काळात आसाम आणि मेघालयातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशाच्या काही शहरांमध्ये सकाळी दाट धुके पडू शकते.