नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) - पुणे मार्गावरील सिन्नरफाटा परिसरात सुरक्षा रक्षकावर स्कु ड्रायव्हरने हल्ला करून खिशातील रोकड चोरून घेऊन जाणाऱ्या अट्टल गुन्हेगारास नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. युवराज सुनिल साळुंखे (२१, रा. अंबर सोसायटी, मखमलाबाद) असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सिन्नरफाटा येथील महाराष्ट्र माझा या हॉटेलचा सुरक्षा रक्षक प्रकाश विष्णू बच्छाव (५२) हे ड्युटी करत असताना ३० अॉक्टोबरला पहाटे ४ वाजता मोटारसायकल वरून तिघेजण आले. त्यांनी स्क्रू ड्रायव्हने डोक्यात वार करून त्यांना जबर जखमी करत खिशातील १६०० रुपये जबरीने चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकावर गस्त घालत असताना मोटारसायकल वरून तिघेजण जाताना दिसले.
पोलीस विचारपूस करत असताना त्यातील एकाच्या शर्टवर रक्ताचा डाग दिसून आला. आरोपींच्या हे लक्षात येताच त्यांनी मोटारसायकल वरून पळ काढला. मात्र पोलिसांनी एक किलोमीटर पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यातील प्रमुख आरोपी युवराज साळुंखे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर शहर व जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.त्याच्याकडून मोटारसायकल, लुटीची रक्कम तसेच स्क्रू ड्रायव्हर हस्तगत करण्यात आले आहे.