नाशिक (प्रतिनिधी) :- बांधकामाच्या बदल्यात सव्वा कोटी रुपये स्वीकारून बांधकाम पूर्ण न करता फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राहुल जयप्रकाश लुणावत (वय 41, रा. वनराज सोसायटी, द्वारका, नाशिक) यांनी कारडा कन्स्ट्रक्शन्स या फर्मचे चेअरमन नरेश कारडा, मॅनेजिंग डायरेक्टर मनोहर कारडा, देवेश कारडा व आणखी एक जण यांना डेव्हलपमेंटचे काम दिले होते. दरम्यान, अशोका मार्ग येथील कारडा कन्स्ट्रक्शन्सच्या हाय स्ट्रीट शॉपिंग मॉलचे काम सुरू होते. त्यादरम्यान, व्यावसायिक भागीदार सतीश कोठारी यांनी तेथे दोन गाळे बुक केले होते. दोन्ही गाळ्यांची किंमत 2.86 कोटी रुपये ठरली होती. व्यवहार करताना कारडा यांनी मनपाच्या हद्दीतील दुसऱ्याच बांधकामाची परवानगी दाखविली. सुरुवातीला 1 कोटी 20 लाख रुपये बांधकामाच्या बदल्यात लुणावत व कोठारी यांनी कारडा यांना देत साठेखत केले होते.
उर्वरित रक्कम ताबा घेण्याच्या वेळी देण्याचे ठरले होते; मात्र चार वर्षे होऊनही शॉपिंग मॉलचे काम पूर्ण होत नसल्याने फिर्यादी लुणावत यांनी नरेश कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली; मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार 13 डिसेंबर 2019 ते दि. 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला. या प्रकरणी लुणावत यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली होती.
त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी चार आरोपींपैकी कारडा कन्स्ट्रक्शन्सचे चेअरमन नरेश कारडा यांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे करीत आहेत. याप्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.