नाशिकरोड (प्रतिनिधी): पिंपळगाव खांब येथे शाळकरी विद्यार्थ्यावर हल्ल्याची घटना ताजी असतांना आज पहाटे जय भवानी रोडवर वन विभागाने बिबट्या जेरबंद केला. मात्र अजून एक बिबट्या या ठिकाणी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळगाव खांब येथे नऊ वर्षीय अभिषेक चारसकर वर बिबट्याने काल हल्ला केला होता. जयभवानी रोडवरील पाटोळे मळा हा आर्टलरी सेंटरला लागून असलेल्या भागात दीड महिन्या पूर्वी बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. पुन्हा या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने शिवसेना महिला आघाडीच्या योगिता गायकवाड व नागरिकांच्या मागणी नुसार वन विभागाने या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.
मध्यरात्री यात एक बिबट्या अडकला तर पिंजऱ्या बाहेर आणखी एक बिबट्या असल्याचे रहिवाशांना दिसून आले. त्या करीता तत्काळ दुसरा पिंजरा लावण्यात येणार आहे. आरएफओ वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील, अनिल आहिरराव व सुनील खानझोडे यांनी जेरबंद झालेल्या बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी गंगापूर येथील रोपवाटिका येथे हलविले.
दरम्यान, पिंपळगावखांब येथील विद्यार्थ्यावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याप्रकरणी आरएफओ वृषाली गाडे, वनपाल उत्तम पाटील, विजय पाटील, अशोक खानझोडे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली व त्या ठिकाणी पिंजरा लावला.