१६ एप्रिल २०२४
दि.१५ एप्रिल रात्री १२:२० वाजता सागर पोपटराव भालके (रा, दाढेगांव पिंपळगाव खांब ता.जि. नाशिक) हे घरात गरम होत असल्याने घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्यांना बिबट्या बाबत आलेला थरारक अनुभव त्यांनी सांगितला.
ते म्हणाले, घरामध्ये गरम होत असल्याने मी घराबाहेर येऊन बसलो होतो. थोड्याच वेळात घराशेजारी राहणारे गवळी यांच्या घरावरील पत्रे वाजल्याचा आवाज आला. सुरुवातीला मांजर वगैरे असेल म्हणून दुर्लक्ष केले. तितक्यात बिबट्याने पत्र्यावरुन माझ्या समोर ४ फुटावर उडी घेतली.
बिबट्याने जोराची डरकाळी फोडत माझ्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे असलेली खुर्ची मी जोराने त्याच्या दिशेने आपटली, तेव्हा तो मागे वळून लोणे यांच्या घराकडे पळाला. साक्षात मृत्यू माझ्या समोर आला होता.
दैव बलवत्तर म्हणून वाचलो. घरात दोन लहान लेकरं आहेत. आई दिव्यांग आहे. अंगाचा थरकाप अजुनही चालु आहे. बिबट्या पिंजऱ्यात अनेकदा बघितला होता. पण आज मी त्याच्या तावडीतून वाचलो.
वनविभाग नाशिक यांनी दाढेगांव येथे तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी त्यांनी पत्रकारांना पाठवलेल्या आपल्या संदेशा द्वारे केली आहे.
Copyright ©2024 Bhramar