नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- आज पहाटेच्या सुमारास नाशिकरोड जवळील मौजे जाखोरी येथील संतोष वामन जगळे यांचे मालकी गट नं. 163 मधील विहीरीत एक बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. नर जातीचा बिबट्या पडण्याच्या घटनेची माहिती मिळताच, नाशिक वनपरिक्षेत्रातील जलद वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व आवश्यक साधनसामग्रीसह कार्यवाही सुरू केली.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या एका कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असताना विहिरीत पडला. बिबट्या (नर, वय अंदाजे 6-7 वर्षे) कठडे नसलेल्या विहीरीत पडून एका कपारीवर बसलेला आढळला. पथकाने तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही करत पिंजराच्या सहाय्याने बिबट्यास विहीरीतून सुरक्षित बाहेर काढले. अर्ध्या तासाच्या आत, बिबट्या सुरक्षितपणे विहीरीच्या बाहेर आला.
त्यानंतर, बिबट्याला प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे पाठवण्यात आले. वन्यजीव बचाव कार्यवाही उपवनसंरक्षक, पश्चिम भाग नाशिक सिद्धेश सावर्डेकर, आणि सहायक वनसंरक्षक, (प्रादेशिक),प्रशांत खैरनार, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी,सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वात पार पडली.
जलद वन्यजीव बचाव पथकातील वनपाल अनिल अहिरराव, कुशाल पावरा, वनरक्षक विजय पाटील, दीपक जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र ठाकरे, गोविंद काळे, सचिन आहेर, संतोष चव्हाण, मोहन लकडे, वाहन चालक अशोक खानझोडे, शरद अस्वले, विजय साळुंखे, विशाल शेळके यांचे तसेच टीम रेस्क्यूचे अभिजीत महाले, हर्षद नागरे आणि जाखोरी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. सदर कामगिरी वन्यजीव सुरक्षा व बचाव कार्यातील एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरली आहे.