नाशिक (प्रतिनिधी) :- विल्होळीत गट नंबर 165 मधील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. विल्होळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे तेथील रहिवाशांनी वनविभागाला कळवले होते. त्यानुसार परवा दौलत वामन चव्हाण यांच्या शेतात पिजरा लावण्यात आला होता.
आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याचे रेस्क्यु करण्यासाठी वन अधिकारी ऋषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, अशोक खानझोडे, पांडु भोये हे प्रयत्न करत होते. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा बिबट्या सुमारे 4 वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, विल्होळी गावासह आजुबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने सायंकाळी तेथील नागरीक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. शेतातही जाण्यास त्यांची हिंमत होत नव्हती.