नाशिकरोड (प्रतिनिधी):- कोटमगाव येथे दारात बसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कोटमगाव येथे बिबट्याचे दर्शन होत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली होती. पाहणी करून वन विभागाने गट नंबर 393 या उसाच्या शेताजवळ पिंजरा लावला होता. पिंजरा लावल्याने शेतकऱ्यांना आशा होती कि बिबट्या पिंजऱ्यात अडकेल,
मात्र लावलेल्या पिंजऱ्या पासून काही अंतरावर असलेल्या भगवंत रामा घुगे हे शेतकरी दि 26 जानेवारी रोजी संध्याकाळी घराच्या ओट्यावर बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्याने त्यांच्या वर झेप घेत हल्ला केला. प्रसंगावधान राखीत घुगे यांनी दोन्ही हाताच्या ताकतीने बिबटयाला दूर लोटले आणि जोरजोरात आरडाओरड केली. थोड्या दूर वर फेकलेल्या गेलेल्या बिबट्याने मग बाजूला असलेल्या कुत्रावर हल्ला चढवला आणि त्याला ठार करीत शिकार केली.
या हल्ल्यात घुगे यांच्या डोक्याला बिबटयाचे नख लागले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे बिबट्या पुन्हा आला आणि लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाला माहिती मिळताच वन अधिकारी अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शना खाली अधिकारी विजय पाटील व सहकारी यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.
तीन ते चार वर्षाचा मादी जातीचा बिबट्या असून त्याला पुढील उपचारासाठी गंगापूर रोपवाटिका येथे दाखल केले आहे. काही दिवसात त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.