नाशिकरोड (प्रतिनिधी):- देवळाली कॅम्प परिसरातील रेल्वे स्टेशन जुनी स्टेशन वाडी लगत आलेल्या नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात मादी जातीचा तीन ते चार वर्षाचा एक बिबट्या पिंजराबंद झाला असून याच परिसरात अजूनही काही बिबटे मुक्त संचार करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच भागात एकाच वेळी दोन ते तीन बिबटे एकत्र भिंतीवरून मुक्त संचार करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होता. त्याची दखल घेत वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजरा लावल्यानंतर दोन दिवसांच्या आत एक बिबट्या जेरबंद झाला.
जेरबंद झालेल्या बिबट्याला वन अधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खांनजोडे यांनी गंगापूर रोपवाटिकेत हलविले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाईल.