नाशिकरोड (प्रतिनिधी): नानेगाव येथे उसाच्या मळ्यात लावलेल्या पिंजाऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. गावकऱ्यांना बिबट्या अडकल्याचे कळताच त्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
गेल्या पंधरा दिवसांपासून नानेगावातील शेतकरी यांना शेतीचे कामे करीत असतांना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे रात्री, पहाटे शेतात पाणी भरण्यासाठी किंवा दिवसभर शेती काम करण्यासाठी मजूर येत नव्हते, तर शेतकरी जीव मुठीत घेऊन काम करीत असत. या भागात पिंजरा लावण्याबाबत वन विभागाला मागणी केली असता मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर 434 मधील उसाच्या क्षेत्रात पिंजरा लावला. अनेक दिवस त्याने हुलकावणी दिली.
आज पहाटे साधारण अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि शेतकरी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वन अधिकारी विजय पाटील यांनी त्यास सुरक्षितरित्या गंगापूर रोपवाटिका येथे आणले. त्याच्यावर उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे.