पुण्यातील जुन्नर, शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . आईच्या डोळ्यासमोरच या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , शिरुर तालुक्यात गेल्या दोन महिन्यातली बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. रक्षा अजय निकम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
घराच्या अंगणात आई आपल्या एका मुलाला जेवण भरवत असताना घराजवळ शिकारीच्या हेतूने दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकत शिकार केली. हा शिकारीचा थरार आईच्या डोळ्यासमोरच घडलाय.
बिबट्याने चिमुकल्या मुलीला शेतात फरफटत नेले आणि तिला ठार केले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध घेतला असता दोन तासांनी मुलीचा मृतदेह सापडला. बिबट्याच्या हल्ल्यात रक्षा निकम या ४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या या परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसंच या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.