काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले.
पुणे विमानतळावरुन या दोघांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी कर्वे नगरमधील त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला.
यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नीने बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेला प्रकार शरद पवार यांना सांगितला. दुपारी साडेतीन चारच्या सुमारास हे घडलं. आमचा काश्मीरमध्ये फिरण्याचा पहिलाच दिवस होता.
दहशतवाद्यांनी प्रतिकार करणाऱ्या घोडेवाल्यालाही मारलं. तो पर्यटकांना मारु नका, असे सांगत होता. दहशतवाद्यांनी तोंडावर मास्क घातले होते. लोकांचे जीव धोक्यात घालणं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणं थांबलं पाहिजे. आज माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमचा माणूस आमच्या डोळ्यांदेखत गेला. तिथूनची स्थानिक लोकं आणि लष्कराचे अधिकारीही आमच्यासाठी रडत होते, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.
संतोष जगदाळेंच्या डोक्यात गोळी, कुटुंबीयांना चेहराही पाहता आला नाही
संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मी कालपासून माझ्या नवऱ्याचा चेहराही बघू शकली नाही. काश्मीरमध्ये असताना आम्हाला मृतदेहाचा चेहरा बघता आला नाही, इथेही त्यांचा चेहरा उघडू दिला जात नाहीये. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली. आमच्यासाठी काहीतरी करा. त्या दहशतवाद्यांना शोधा आणि मारा. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांच्या डोक्यात गोळी घालून मांस बाहेर काढलं, रक्त काढलं, तसंच त्यांच्यासोबत करा आणि दहशतवाद्यांचे मृतदेह आम्हाला दाखवा. दहशतवाद्यांनी लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. तेव्हा लहान मुलं रडत होती. तिकडून खाली उतरताना आम्ही चिखलात पडलो. त्यामुळे मला पायांवर उभंही राहता येत नाही, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल