शरद पवारांना मोठा धक्का देत बड्या नेत्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी एकाच कार्यक्रमात तीन पक्षातील प्रतिनिधींचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत केले. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस अशा तीन पक्षातील मान्यवरांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी आज त्यांच्या उपस्थित काहीजणांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता.पुणे जिल्ह्यातील दोन जुन्या सहकाऱ्यांची परत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये घरवापसी झाली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे आणि जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.
पुणे शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत रोहन सुरवसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये एन्ट्री घेतली. या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चा बांधणीला करायला सुरुवात केली आहे.