अनेक दिवसांपासून दोन्ही पवार एकत्र येणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का ? असा सवाल सध्या चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्यात. याला निमित्त ठरलंय शरद पवारांनी केलेले मोठं वक्तव्य. इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिलीय. इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय. पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झालेत का अशा चर्चा रंगल्यात.
शरद पवार काय म्हणाले?
आमच्या पक्षांतर्गंत दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं. अजित पवारांसोबत जावं असं एका गटाला वाटतं. एका गटाला वाटतं की भाजपसोबत जाऊ नये. इंडिया आघाडी सध्या सक्रीय नाही. विरोधी पक्षात बसायची की नाहे हे सुप्रिया सुळेंनी ठरवावं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवाराच्या पक्षात दोन मतप्रवाह निवडून आलेल्या आमदारांमध्ये पाहायला मिळत होते. अनेक आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण यासंदर्भात माध्यमांसमोर कोणीही वक्तव्य केले नव्हते.
मात्र आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच या संदर्भात मोठं भाष्य केले आहे. अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पक्षातील काही आमदार मतदारसंघातील प्रश्न घेऊन अजित पावरांची भेट घेत असतात. तर काही आमदार प्रसारमाध्यमांवर अजित पवारांवर टीका करताना दिसून येतात. त्यामुळं या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.