शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी पुढे टिकणार का अशा चर्चा रंगल्या असताना आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीतील मविआच्या सुमार कामगिरीनंतर मविआच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मविआत पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडतायत. त्यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवर तब्बल दीड तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय शिजलं आणि काय ठरलं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
पवार-ठाकरेंच्या बैठकीत कोण?
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या. यावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे आणि पवार भेट पार पडल्यानं चर्चांना उधाण आलं.
याबाबात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एका वृत्त वाहिनीला माहिती दिली. त्यानुसार विधानसभेचे निकाल लागल्यापासून पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि ठाकरे गटाच्या स्वतंत्र बैठका झाल्या. मात्र तिन्ही पक्षांची एकही बैठक झाली नाही. यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे काँग्रेसनं स्वपक्षीयांचीही साधी बैठक घेतलेली नाही. काँग्रेसमध्ये आलेली मरगळ पाहता ठाकरे आणि पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनीती तर आखलेली नाही ना? याचीच आता चर्चा रंगलीय़.