ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा हे आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मुंबईतील मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
यावेळी माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्तेही भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होणार असल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय प्रवास आणि पार्श्वभूमी
पांडुरंग बरोरा यांनी २०१४ साली आमदार म्हणून विजय मिळवला होता. मात्र, २०१९ साली त्यांचा पराभव झाला. त्यांनतर २०२४ मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा अवघ्या १३०० मतांनी पराभव झाला. मात्र, आज बरोरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.