पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS)नावाच्या आजाराने डोक वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आतापर्यंत दोन जणांचा जीबीएसची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याचदरम्यान आता पुणे महापालिकेने रुग्णांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आठवड्याभरात रुग्णांची संख्याही 127 वर पोहोचली आहे. या आजारावर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार सुरू आहे. पण आता पुणे पालिकेनं जीबीएस रूग्णांना खासगी हॉस्पिटलचं बील भरण्यासाठी 1 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
14 जानेवारीनंतर खासगी हॉस्पिटलात दाखल झालेल्या झालेल्या जीबीएस रूग्णांना मिळणार 1 लाखांची मदत मिळणार आहे. शहरी गरीब योजनेची मर्यादाही जीबीएस रूग्णांसाठी 2 लाखांपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे.
दरम्यान, आज सिंहगड इथं उपचार घेणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला कॅन्सरग्रस्त होती. तिच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. आज संध्याकाळी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला जीबीएस संशयित असल्याचीही माहिती समोर आली आहे. याआधी 26 जानेवारी रोजी, पुण्यातील DSK विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू झाला होता.