देवळाली कॅम्पला बिबट्या जेरबंद
देवळाली कॅम्पला बिबट्या जेरबंद
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी) :-देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशन वाडीजवळील पगारे चाळलगत नाल्यात लावण्यात आलेल्या पिंजाऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकला. दोन महिन्यांत याच ठिकाणावरून तीन बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. 
 
काही महिन्यांपूर्वी देवळाली कॅम्प, जुनी स्टेशन वाडी, पगारे चाळजवळील भिंतीवर तीन बिबटे असल्याचा व्हिडिओ समाजमध्यमावर दिसत होता. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी वन विभागाला आग्रही मागणी करून पिंजरा लावला, दोन महिन्यात तिसरा चार वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाचे वन रक्षक विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप, प्राणी मित्र विक्रम काडळे हे घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यास रेस्क्यू करून गंगापूरच्या रोपवाटिकेत नेण्यात आले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.

जेरबंद बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणत गर्दी केली होती. या भागातील सुयोग तपासे, सतीश भालेराव, रुपेश केदारे, राहुल उन्हावणे, सिद्धेश भवर, विमल भवर, अलका जगताप यांनी या परिसरात आणखी बिबटे असून त्यांना पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.

देवळाली कॅम्पच्या पश्चिम भागात लष्कराचे मोठे फायरिंग रेंज आहे. त्या भागात लष्कराच्या फायरिंगचा सराव सुरू झाल्यानंतर घाबरून बिबटे थेट नागरी वस्तीकडे धाव घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group