बिबट्याच्या हल्ल्यात  11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- इगतपुरी तालुक्यात पुन्हा बिबट्याने एका मुलावर हल्ला केला असून, त्यात हा अकरा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. बिबट्याने मात्र कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

इगतपुरी तालुक्यामध्ये सातत्याने बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही काळ या परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले थांबले होते; परंतु पुन्हा एकदा बिबट्या या परिसरामध्ये दिसू लागला आहे.

इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे बिबट्याच्या हल्यात 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण सारुक्ते असे जखमी झालेल्याचे नाव असून, ही घटना काल (दि. 9) सायंकाळी घडली. प्रवीण सारुक्ते हा आपल्या घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात आईवडिलांबरोबर गेला असता उसाच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

आईवडिलांनी आरडा ओरडा करून बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून हा मुलगा वाचला; मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण गंभीर जखमी असून, त्याला घोटी येथील खासगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group