नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- देवळाली कॅम्प जवळील वंजारवाडी येथील घरा समोर पिण्याच्या पाण्यासाठी बनवलेल्या छोट्या विहिरीत आज पहाटे बिबट्या पडला. विहिरी वरती जाळी असल्याने बिबट्याला बाहेर येणे शक्य झाले नाही. वन विभाग त्याचे रेस्क्यू करीत आहे.
वंजारवाडी येथील मारुती मंदिरा मागे गावातच भाऊसाहेब किसन शिंदे व प्रकाश किसन शिंदे या बंधुचे घर आहे. घराला लागून गट नंबर 15मध्ये भातची लागवड केली असून त्याच्या बाजूला पेरू चा बाग आहे. शिंदे बंधू परिसरातुन दूध संकलित करून गोरस दूध म्हणून पॅंकिंग करून विक्री करतात. त्याचे काम ही घरा समोर चालते.
शिंदे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरा समोर 12ते 13फूट खोल असलेली छोटी विहीर तयार केली आहे. बोरींग, नदीचे पाणी त्यात साठवून ते फिल्टर करून त्याचा वापर शिंदे बंधू करतात.त्यामुळे विहिरीवर जाळी टाकण्यात आली आहे.
आज सकाळी विहिरीतुन काही आवाजयेऊ लागल्याने भाऊसाहेब शिंदे जाळी बाजूला करून पाहिले असता त्यात असलेल्या जलपरिच्या पाईप ला एक बिबट्या त्याच्या नजरेस पडला. त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व वन विभागाला कळवले. वन अधिकारी विजय पाटील व पथक बिबट्या चे रेस्क्यू करण्यासाठी घटना स्थळी दाखल झाले असून गावकर्यांनी मोठी गर्दी केली आहे.