दत्त मंदिर चौकात रस्तारोको;  वाहनांच्या लांबच लांब रांगा
दत्त मंदिर चौकात रस्तारोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे नाशिक पुणे महामार्ग वरील दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलक व पोलीस यांच्यात काही काळ वाद निर्माण झाले होते. वीस ते पंचवीस आंदोलकाना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.
   
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटबंनेच्या पडसाद राज्यभरात उमटले असून विविध ठिकाणी एकाच वेळी रस्तारोको आंदोलनाची हाक सकल मराठा समाज, शिवप्रेमी संघटनानी दिली होती. त्या अनुषंगाने नाशिक पूणे महामार्ग वरील दत्त मंदिर चौकात सकल मराठा समाज, दलित बांधव, शिवप्रेमी संघटनाचे पदाधिकारी यांनी एकत्र येत शिवरायांच्या जयजयकार च्या घोषणा देत रस्तारोको केला.

अचानक झालेल्या या रस्ता रोकोमुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतले, तरुणांनी गाड्यासमोर ठिय्या मांडल्याने पोलीस अधिकारी व आंदोलक यांच्या मध्ये बाचाबाची झाली. सुमारे तासभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे दत्त मंदिर पासून ते द्वारका तर पूर्व भागात पळसे पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात सकल मराठा समाजासह दोन्ही शिवसेना, भाजपा, रिपाई, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, महिला मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. 

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे जितेंद्र सपकाळे, नाशिकरोडचे रामदास शेळके व वाहतूक विभागाचे दिनकर कदम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group