केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. कर्तव्यदक्ष अधिकारी, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि केज तालुक्याचा तरुण चेहरा असलेले तहसीलदार अशी राकेश गिड्डे यांची ओळख होती. अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावरचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात घडला.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आज सकाळी आपल्या कारने प्रवास करत होते. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर जवळील पिंपळ फाटा इथे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटलं आणि कार उलटली. एकदा नाही तर दोन तीन वेळा ती उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी कारमध्ये ते एकटेच होते. महामार्गावर कार पलटी झाल्याचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस सध्या या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.
राकेश गिड्डे हे आपल्या कार्यक्षमतेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. महसूल विभागात काम करताना त्यांनी अनेक कठीण प्रश्न मार्गी लावले होते. केज तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करताना सामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांचा नेहमीच भर असायचा. एका तरुण आणि तडफदार अधिकाऱ्याचा असा अपघाती अंत झाल्याने प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. "प्रशासन चालवणारा एक संवेदनशील माणूस गेला..." अशा भावना केजमधील नागरिक व्यक्त करत आहेत.