नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तहसीलदारपदाची सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी एका तरुणाला बारा लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांच्याशी आरोपी अतुल पेठकर, वजीर हुजावर व सोनाली मॅडम नामक महिला अशा तिघा जणांनी संपर्क साधला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना तहसीलदारपदाची सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर फिर्यादीकडून या तीनही आरोपींनी जानेवारी 2024 ते 26 जून 2025 या कालावधीत हॉटेल एसएसकेसमोर गोल्फ क्लब मैदान येथे रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण 12 लाख रुपये घेतले; मात्र नोकरी लावून दिली नाही, तसेच घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक करून त्यांनी दिलेल्या रकमेचा अपहार केला.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अतुल पेठकर, वजीर हुजावर व सोनाली मॅडम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.