राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनीसमोर ही घटना घडली.
अपघाताच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेनंतर प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अपघात नेमका कशामुळे घडला याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्याहून मोरगावकडे एक स्विफ्ट डिझायर कार निघालेली होती. जेजुरी येथून मोरगावकडे जात असताना एका ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला (क्र. एमएच 42 एएक्स 1060) साहित्य खाली करत असतानाच जोराची धडक झाली. या पिकअपमधून साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात पिकअप टेम्पोतून साहित्य बाहेर काढणारे आणि कारमधील काही प्रवासी अशा एकूण आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या मयतांमध्ये कारमधील चार जणांचा समावेश आहे अशी माहिती पुढे येत आहे.
अपघातातील जखमी लोकांना जेजुरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामू संजीवन यादव (दोघे रा. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवार वाडी ता. इंदापूर), अश्विनी संतोष येसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर), अक्षय संजय राऊत (रा. झारगडवाडी ता. बारामती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही .