राज्यभरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच मुलूंडमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुलुंड मध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कार ने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिल्याने या घटनेत एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर बीएमडब्ल्यू कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रितम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. याचवेळी अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असतांना यादोघांना जोरदार धडक दिली.
धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही, तो मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. या या अपघातात प्रितम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सध्या कार आणि फरार चालकाचा शोध घेत आहेत.