मनमाड (नैवेद्या बिदरी) :- प्रवासा दरम्यान चोरीच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र घाईगडबडीत नकळतपणे चक्क दुसऱ्याची प्रवासी बॅग घेऊन जाणाऱ्या प्रवाशाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेऊन ज्या प्रवाशाची प्रवासी बॅग होती त्या प्रवाशाला परत देण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी हे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर गस्त घालत असताना गाडी क्रं. २२१७८ वाराणसी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ही प्रवासी रेल्वे गाडी मनमाड रेल्वे स्थानकात आले असता गाडीतील बी / ४ या भोगी मधील मनीष विशनदासानी रहाणे, वय -२६ वर्षे, रा. शहडोल, पृथ्वीनगर या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने बॅग लंपास केली. याबाबत तक्रार गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा वाल्याच्या कर्मचाऱ्यांना दिली.
दिलेल्या तक्रारीवरून गस्त घालणाऱ्या आणि स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेऊन सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतल्या असता सीसीटीव्ही मध्ये अज्ञात व्यक्ती आढळून आला तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता याच गाडीतून माझा ग्रुप व मी पाचोरा ते मनमाड प्रवास करत होतो. उतरण्याच्या घाईगडबडीत नकळतपणे नजरचुकीने दुसऱ्या प्रवाशाची प्रवासी बॅग माझ्याकडे आले असल्याची कबुली सदर अज्ञात व्यक्तीने रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
या प्रवासी बॅग मध्ये लेनोव्होचा कंपनीचा ३० हजार रूपयांचे लॅपटॉप, अॅपल कंपनीचे १० हजार रुपयांचे पॅड, २ हजार रुपये रोख, मनी पर्स (बटवा), आधार कार्ड, पॅनकार्ड, कपडे, खाद्यपदार्थ होते.तपासणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने तक्रारदार प्रवाशाला म्हणजेच मनीष विशनदासानी रहाणे यांना सुपूर्द करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक संदीपकुमार देसवाल, समाधान गांगुर्डे, धर्मेंद्र यादव, दिनेश यादव आदि रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.