एकीकडे देशभरासह राज्यात वर्षभर वाट पाहून श्री गणरायाचे आगमन होत असतानाच राज्यातच नव्हे तर देशात प्रवासी गणपती म्हणून ओळख असलेल्या गोदावरी राजाचे प्रवास थांबल्याने प्रवाशांसह चाकरमाने,शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचे हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले.
देशासह राज्यात ख्याती असलेल्या उत्तर महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस - मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ या मंडळाचा धावत्या गाडीतील श्री गणेश उत्सवाला यंदाही ब्रेक लागणार आहे. अनेक वर्ष सातत्यपूर्ण मागणी करूनही गोदावरी एक्सप्रेस सुरू झाली नाही. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.त्यामुळे श्री गणरायाला घडणारा मनमाड ते कुर्ला हा दररोज तीनशे किलोमीटरचा प्रवास याही वर्षी गणेशोत्सवात खंडित होणार आहे. मंडळाचे २७ वर्ष होते. गेल्या २७ वर्षापासून धावत्या गाडीमध्ये साजरा होणारा हा गणेशोत्सव नाशिक जिल्ह्यात नव्हे तर राज्यातसह देशात प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
हे ही वाचा
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस या गाडीमध्ये दरवर्षी नियमित प्रवास करणारे चाकरमाने व प्रवासी वर्ग यांनी गणेश मंडळाच्या माध्यमातून या उत्सवाचा श्री गणेश केला गोदावरी एक्सप्रेसच्या सीजन तिकिट अर्थात मासिक पास बोगीत आकर्षक सजावट करून श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना दरवर्षी केली जात होती.
मनमाडहून गाडी सुटल्यानंतर आणि परतीच्या प्रवासात नाशिक येथून गाडी सुटल्यानंतर दररोज गाडीमध्ये श्रींची आरती होऊन सर्व प्रवाशांना प्रसाद वितरण केले जात होते. यानिमित्त मासिक पासबोगीची आकर्षक सजावट करून सुशोभित करण्यात येत होती. पण कोविड काळात गोदावरी एक्सप्रेस बंद झाली त्यानंतर रेल्वेने स्वतंत्र बोगी उपलब्ध करून दिली त्या बोगीमध्ये या गणेशाची स्थापना होऊ लागली. मात्र गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू व्हावी यासाठी चाकरमान्यांसह प्रवासी आणि विद्यार्थी देखील आग्रही होते.
हे ही वाचा
वारंवार खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांना मागणी करून देखील मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला मनमाड गोदावरी एक्सप्रेस सुरू न झाल्याने यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा झटका देखील बसला. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकी वेळी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांनी गोदावरी एक्सप्रेसचा हायलाईट करत निवडणूक जिंकली.मात्र अद्यापही विद्यमान खा.भास्कर भगरे यांना गत वर्षभरात हा प्रश्न सोडवण्यात यश आले नाही.
गाडी बदलली पण गोदावरी एक्सप्रेस सुरु झाली नाही
गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी, अशी वारंवार मागणी करूनही ही गाडी अद्याप पर्यंत सुरू होत नाही. याच गाडीच्या वेळेत समर स्पेशल पर्यायी मनमाड मुंबई गाडी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सध्या गोदावरी एक्सप्रेस ऐवजी धुळे -मुंबई ही पर्यायी गाडी या वेळेत धावते पण या गाडीमध्ये गणेशोत्सवात श्रींची स्थापना करणे आणि गणेशोत्सव साजरा करणे शक्य नाही. दरम्यान मतदारसंघातील खासदार बदलला तरी प्रश्न मार्गी लागला नाही अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.
हे ही वाचा
गोदावरीच्या राजाचा प्रवास सलग दुसऱ्या वर्षी थांबला आहे. कारण गोदावरी एक्सप्रेस अजून सुरू झालेली सुरू झालेली नाही. रेल्वेच्या असहकाराच्या धोरणामुळे उत्सव करू शकत नाही. रेल्वे प्रशासनाकडे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन गोदावरी एक्सप्रेस का सुरू करू शकत नाही याची ठोस कारण देत नाही. कोरोना काळापासून रेल्वेने ही गाडी रोखून धरली आहे. प्रवासी संघटनेने वेळोवेळी राजकीय पक्षांसह रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र रेल्वे प्रशासनाच्या आडमुठे धोरण व असहकारामुळे गोदावरीच्या राजाचा प्रवास आखेर थांबला..
- नरेंद्र खैरे,मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते व प्रवास संघटना सदस्य